अहमदनगर उत्तर महाराष्ट्र कोंकण टॉप न्युज ताज्या बातम्या पश्चिम महाराष्ट्र पिंपरी – चिंचवड पुणे पुणे जिल्हा मराठवाडा महाराष्ट्र मुख्य बातम्या मुंबई राज्य रूपगंध विदर्भ

एकमेवाद्वितीय

– प्रांजली देशमुख

  • भारतामध्ये क्रिकेटवेड असले तरी त्यालाही पुरुषप्रधानतेची झालर आहे. त्यामुळेच महिला क्रिकेट संघाचे अथवा महिला क्रिकेटपटूंच्या यशाचे फारसे कौतुक होत नाही. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने अलीकडेच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम प्रस्थापित केला. तरीही तिच्या या विक्रमाबद्दल तिचे फारसे कौतुक झाले नाही. अर्थात, त्यामुळे तिने मिळवलेले यश दुय्यम ठरत नाही. या विक्रमाच्या निमित्ताने तिच्या कारकिर्दीचा आढावा घेताना ही “रनसम्राज्ञी’ चतुरस्र असल्याचे लक्षात येते.

क्रिकेटमध्ये केवळ भारतीय पुरुष संघ नाही तर महिला संघांनेदेखील बस्तान बसवले आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवत पुरुष खेळाडूपेक्षा आपण कमी नाहीत, हे जगाला दाखवून दिले आहे. मितालीने विक्रम केल्यानंतर क्रिकेट जगतातील अनेक मान्यवर खेळाडूंनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर तिच्या फलंदाजीचे कौतुक झाले. यात विराट कोहलीचा देखील समावेश आहे. कोहलीने म्हटले की, भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील हा मोठा क्षण आहे. मिताली राजने महिलांच्या एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा काढणारी आघाडीची फलंदाज बनली आहे. ती चॅम्पियन आहे. अशा शब्दांत विराटने तिच्या फलंदाजीचे वर्णन केले आहे. मितालीने 6 हजार धावा काढून केवळ महिला खेळाडूत नव्हे तर पुरुष संघातील खेळाडूंना देखील मागे टाकले आहे. मितालीने 6 हजार धावा 183 सामन्यात 164 डावात पूर्ण केल्या आहेत. तर दुसरीकडे सचिन तेंडुलकरने 170 डावात 6 हजार धावा केल्या आहेत. रिकी पॉटिंगने 166 डावात 6 हजार धावा पूर्ण केल्या तर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 2011 मध्ये 166 डाव खेळून 6 हजार धावांचा पल्ला गाठला होता. अशा विश्‍वविक्रमवीर मितालीने विक्रम नोंदवला असला तर भारतीय संघाच्या पराभवाने त्यावर विरजण पडले आहे. तरीही तिचे योगदान नाकारता येत नाही.

या दिग्गज खेळाडूला लहानपणी क्रिकेटमध्ये अजिबात रुची नव्हती आणि तिला नृत्यकलाकार व्हायचे होते. एवढेच नाही तर मितालीने शास्त्रीय नृत्य भरतनाट्यममध्ये अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. दहा वर्षांची असताना तिला क्रिकेटर होण्याची भविष्यवाणी झाली आणि ती खरी ठरली. हैदराबाद शहराने देशाला अनेक मातब्बर खेळाडू दिले आहेत. त्यात मिताली राज आणि गोलंदाज ज्योती यादव यांचा समावेश करावा लागेल. प्रशिक्षक संपतकुमार यांनी मिताली दहा वर्षांची असतानाच तिच्यातील गुण हेरून क्रिकेटचे प्रशिक्षण सुरू केले होते. मित्रकंपनीत मीतू नावाने प्रसिद्ध असलेली मितालीला नृत्यकलाकार व्हायचे होते, मात्र, तिला तिच्या नशिबाने क्रिकेटच्या मैदानाकडे खेचून आणले. मितालीचे वडील हवाई दलातील माजी अधिकारी दोरई राज यांनी लहानग्या मितालीला सेंट जॉन कोचिंग कॅम्पमध्ये घेऊन गेले.

मितालीला उशिरापर्यंत झोपायची सवय होती; परंतु तिच्या कुटुंबीयांना तिने झोपेतून लवकर उठावे, असे वाटत होते. त्यासाठी तिचे वडील तिला सिकंदराबादच्या प्रशिक्षण केंद्रात नेऊ लागले. त्याठिकाणी त्यांचा मुलगा म्हणजे मितालीचा भाऊदेखील खेळत असे. ज्योतीप्रसादने मितालीची प्रतिभा ओळखली. त्यांनी मितालीच्या खेळावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. कारण मितालीमध्ये एक अष्टपैलू क्रिकेटपटू होण्याचे गुण होते. दोरई राज म्हणतात की, सेंट जॉन कोचिंग सेंटर केवळ मुलांसाठी होते. त्यामुळे मितालीसाठी तेथे जागा मिळणे कठीण होते. मात्र ज्योती यांनी प्रशिक्षक संपतकुमार यांना भेटण्यास सांगितले. प्रशिक्षक म्हणून ते कडकशिस्तीचे आहेत, याची सूचनाही ज्योती यांनी मितालीच्या पालकांना दिली. कोचिंगनंतर साधारणत: एका वर्षांनंतर ज्योतीप्रसाद म्हणाले की, मिताली केवळ भारतासाठी खेळेलच असे नाही तर अनेक विक्रमही प्रस्थापित करेल. हा विश्‍वास मितालीने सार्थ ठरवला.

26 जून 1999 मध्ये मितालीने आयर्लंडविरुद्ध 114 धावा तडकावल्या होत्या. यावेळी शतकवीर होणारी ती सर्वांत तरुण खेळाडू ठरली होती. मितालीचे वडील सांगतात की, ज्योतीप्रसाद यांनी मला अणि माझ्या पत्नीला सांगितले की, मितालीचे भवितव्य उज्ज्वल आहे आणि 100 टक्के योगदान देणे गरजेचे आहे. 1997 च्या विश्‍वचषक स्पर्धेत ती केवळ 14 वर्षांची होती. निवड समिती तिच्या निवडीबाबत साशंक होती. मात्र, त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. मिताली राजने बुधवारच्या सामन्यात सर्वाधिक धावा काढून विक्रम प्रस्थापित केला. मितालीने हा विक्रम करत इंग्लंडची चार्लट एडवर्डला मागे टाकले. एडवर्डने 191 साम-न्यात एकदिवसीय सामन्यात 5992 धावा केल्या होत्या. त्यात नऊ शतक आणि 46 अर्धशतकाचा समावेश आहे. मितालीने आतापर्यंत 183 वन डेमध्ये 164 डाव खेळले असून 6 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यातील मितालीचा सर्वाधिक धावा नाबाद 114 आहेत. तिने आपल्या एकदिवसीय सामन्याच्या कारकिर्दीत 48 अर्धशतक आणि 5 शतक झळकवले आहेत. याशिवाय दहा कसोटी सामने देखील खेळले आहेत. यात एक शतक आणि चार अर्धशतकाच्या जोरावर 663 धावा केल्या आहेत. आयर्लंडविरुद्ध 1999 मध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळणाऱ्या मितालीने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. महिला क्रिकेटच्या इतिहासात सलग सात अर्धशतकाचा विक्रम तिने केला असून ती पहिली महिला फलंदाज म्हणून ओळख निर्माण केली आहे. तिने सलग सात डावांत नाबाद 70, 64, 73 नाबाद, 51 नाबाद, 62 नाबाद आणि 71 धावांचा समावेश आहे. याअगोदर ऑस्ट्रेलियाची लिंडसे रिलर आणि इंग्लंडची शार्ले एडवर्ड आणि ऑस्ट्रेलियाची ऍलिस पेरी यांनी एकदिवसीय सामन्यात सलग सहा डावात अर्धशतक लगावले आहे. कर्णधार म्हणून मितालीने 91 डावात 3 हजार 473 धावा केल्या आहेत. तिच्या धावांची सरासरी 56.93 इतकी राहिली आहे.

राजस्थानच्या जोधपूरमध्ये जन्मलेली चौतीस वर्षीय मितालीचा निवडक अशा महिला क्रिकेटपटूंत समावेश आहे की ज्यांची धावांची सरासरी पन्नासपेक्षा अधिक आहे. सर्वांत कमी वयात शतक झळकवणारी मिताली एकमेव क्रिकेटपटू ठरली आहे. 16 वर्षे 205 दिवसाचे वय असताना मितालीने विक्रम केला आणि तो अजूनही कायम आहे.
विशेष म्हणजे मितालीने सलग चौथ्यांदा विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2005 च्या विश्‍वचषक सामन्यात भारतीय क्रिकेट संघ मितालीच्या नेतृत्वाखाली अंतिम सामन्यात पोहोचला होता आणि दुर्दैवाने पराभव पत्करावा लागला आहे. 2006 मध्ये मितालीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडला त्यांच्याच जमिनीवर कसोटी मालिकेत पराभूत करण्याची किमया साधली होती. त्याचवर्षी भारताने मितालीच्याच कर्णधारपदाखाली आशिया कप जिंकला होता.

मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने विश्‍वचषक स्पर्धेत दबदबा निर्माण केला आहे. मिताली राज ही एक आत्मविश्‍वासाने भारलेली खेळाडू आहे. जेव्हा भारतीय संघ फलंदाजी करतो, तेव्हा ती देखील बॅट-पॅड बांधून तयार असते. त्याचवेळी कोणताही मानसिक ताण न घेता सामन्यादरम्यान पुस्तक वाचत बसते. मितालीची ही सवय वेस्ट इंडिजचा महान खेळाडू व्हिव्हियन रिचर्डस याच्याशी मिळतीजुळती आहे. रिचर्डसने कर्णधारपदाचे कधीच ओझे होऊ दिले नाही आणि आपल्या करियरवर परिणाम होऊ दिला नाही. सतत चिंगम खात आणि आपली टोपीवरील धूळ झाडत आत्मविश्‍वासपूर्वक फलंदाजी करत अनेक विक्रम मैदानावर नोंदवले आहेत. मिताली राजचा आत्मविश्‍वास केवळ मैदानावर नाही तर प्रसारमाध्यमांसमोर देखील दिसतो. विश्‍वकप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एकाने आपल्या आवडीचा पुरुष क्रिकेटपटू कोण आहे, असे विचारले. तेव्हा मिताली भडकली आणि आपल्या आवडीचा पुरुष क्रिकेटर का असावा, असा प्रतिप्रश्‍न केला. एखादी महिला खेळाडू होऊ शकत नाही का? असे तिने उपस्थितांना विचारले. अशा बाणेदार “रनवीर’ मितालीला भावी उज्ज्वल करियरसाठी शुभेच्छा देऊ.

Advertisement