आंतरराष्ट्रीय मुख्य बातम्या

काबूलमध्ये कारबॉम्बच्या स्फोटात 26 जणांचा मृत्यू

तालिबानचे कृत्य; 41 जण जखमी
काबूल -अफगाणिस्तानची राजधानी काबूल शहरात आज झालेल्या कारबॉम्बच्या स्फोटात 26 जण मृत्युमुखी पडले, तर 41 जखमी झाले. या स्फोटाची जबाबदारी तालिबान या दहशतवादी संघटनेने स्वीकारली. दरम्यान, जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला लक्ष्य करून तालिबानने कारबॉम्बचा स्फोट घडवला. शियाबहुल भागात हा हल्ला झाला. स्फोटाची तीव्रता प्रचंड होती. त्यामुळे परिसरातील अनेक इमारती हादरल्या. तर स्फोटाचे लक्ष्य ठरलेली बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या दहशतवादी हल्ल्यानंतर तातडीने मदत आणि बचावकार्य हाती घेण्यात आले. जखमींना उपचारासाठी रूग्णवाहिकांबरोबरच खासगी वाहनांमधून रूग्णालयांत हलवण्यात आले. कारबॉम्बचा स्फोट झालेले ठिकाण राजकीय नेते मोहम्मद मोहकेक यांच्या घरापासून जवळच आहे. त्यामुळे मोहकेक यांना लक्ष्य करण्याच्या उद्देशातून हा स्फोट घडवण्यात आल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी रविवारीच अफगाणिस्तानमधील एका रूग्णालयावर हल्ला केला. त्यात 35 जण मृत्युमुखी पडले. या हल्ल्यापाठोपाठ कारबॉम्ब स्फोटाची घटना घडली. त्यामुळे सुरक्षा दले आणखी सतर्क झाली आहेत.

Advertisement