अहमदनगर उत्तर महाराष्ट्र कोंकण गंधर्व टॉप न्युज ताज्या बातम्या पश्चिम महाराष्ट्र पिंपरी – चिंचवड पुणे पुणे जिल्हा मराठवाडा महाराष्ट्र मुख्य बातम्या मुंबई राज्य विदर्भ

का चुकताहेत हवामान अंदाज?

  • हवामान खात्याने वर्तवलेले अंदाज हा आपल्याकडे नेहमी चेष्टेचा विषय असतो. मात्र हवामान खात्याच्या चुकलेल्या अंदाजांमुळे शेतकऱ्यांना, शेतीला आणि पर्यायाने देशाला मोठा फटका बसतो. यंदाच्या वर्षीही याची प्रचिती येताना दिसत आहे. एका बाजूला मान्सूनचा पॅटर्न बदलत असून त्याचा सखोल अभ्यास होणं गरजेचं आहेच; पण त्याहीपेक्षा हवामान अंदाज आणि संशोधनासाठीच्या प्रचलित यंत्रणेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज अधिक आहे. तरच हवामानाविषयीची रिअल टाईम माहिती सर्वसामान्यांपर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येईल आणि त्यातून होणारे नुकसान टाळता येईल.

पुणे वेधशाळा आणि कुलाबा वेधशाळेने यंदा पावसाबद्दलचे खोटे अंदाज व्यक्त केले असून खते आणि बियाणे निर्मिती करणाऱ्या कंपनीशी हवामान विभागाने संगनमत करून राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. हा फसवणुकीचा प्रकार आहे. त्यामुळे हवामान खात्याच्या विरोधात गुन्हा नोंदवावा असा तक्रार अर्ज माजलगाव तालुक्‍यातील एका शेतकऱ्याने केला आहे. यावरुन शेतकऱ्यांमधील संतापाची प्रचिती येते. या पार्श्‍वभूमीवर नेमकं काय चुकतंय याचा विचार आता गांभीर्यानं करण्याची वेळ आली आहे.

हवामानाबाबत आपल्याकडे संशोधन आणि संकलन हे दोन वेगवेगळे भाग मानले जातात. हवामानाचा अंदाज घेण्यासाठी पसरवण्यात आलेल्या उपकरणांच्या जाळ्यातून जमा झालेली माहिती संकलित करण्याची जबाबदारी 1785 पासून कार्यरत भारतीय हवामान विभागाकडे (इंडियन मीटिओरॉजिकल डिपार्टमेंट- आयएमडी) आहे. जमा झालेल्या माहितीवर संशोधन करण्याची जबाबदारी 1962 पासून कार्यरत असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटीओरॉलॉजी (आयआयटीएम) पुणे यांच्याकडे आहे.

यापैकी हवामान खाते हे हवामानाचा अंदाज घेण्यासाठी अक्षम आहे, हे वास्तव सर्वप्रथम लक्षात घ्यावे लागेल. हवामानाचे “रिअल टाईम’ मापन करुन सांगणे यासाठी आवश्‍यक असणारी अद्ययावत यंत्रणाच या विभागाकडे नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे या दोन्ही विभागांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. बहुतांश वेळा आयआयटीएमला माहितीची आवश्‍यकता असल्यास आयएमडीकडून ती दिली जात नाही. याचे कारण श्रेयवाद हे आहे. दुसरीकडे आयआयटीएमकडे भारतातील सर्व ठिकाणची हवामानाची माहिती संकलित करण्याची यंत्रणा नसल्याने त्यांना आयएमडीवर अवलंबून राहण्याखेरीज पर्याय नसतो.
आयआयटीएमची स्थापना झाली त्यावेळी असे निर्धारित करण्यात आले की, आयआयटीमने केलेल्या संशोधनातून निघालेले निष्कर्ष निश्‍चित मानून हवामान विभागाकडे द्यावेत आणि त्यानुसार आयएमडीने जनतेला हवामान अंदाज वर्तवावा. मात्र गेल्या 54 वर्षांमध्ये आयआयटीमकडून अशा प्रकारचे कोणतेही निष्कर्ष आयएमडीला मिळालेले नाहीत. परिणामी, हवामान खाते कोणतेही भाकित नीट वर्तवू शकत नाही.

वास्तविक, आयआयटीएमकडे आदित्य नावाचा सुपर कॉम्प्युटर असून त्याची क्षमता 790+ टेराफ्लॉप प्रतिसेकंद इतकी आहे. मात्र आयएमडीकडून डेटाच न मिळाल्यामुळे आयआयटीएमला मान्सून मिशनसाठी मिळणाऱ्या हजारो कोटी रुपयांचा फायदाच देशाला होत नाही. या दोन्ही खात्यांकडे शेतकऱ्यांपर्यंत
हवामानाचा अंदाज पोहोचवण्यासाठीची कोणतीही यंत्रणा नाही. परिणामी, ढगफुटी अथवा अतिवृष्टीसारख्या घटनांचा अंदाज न वर्तवता आल्याबद्दल जबाबदार धरल्यास दोन्हीही खाती जबाबदारी झटकताना दिसतात. त्यांना जनतेशी कोणतेही देणे-घेणेही नाही. लेखकाने 12 वर्षे आयआयटीएममध्ये काम केलेले आहे. त्यामुळे मी या यंत्रणेमधील उणिवा, दोष जवळून पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या आहेत. त्यावरुन मी ठामपणाने या दोन्हीही यंत्रणा कुचकामी आहेत, असे सांगू शकतो. या यंत्रणांमधील उणिवांचा फायदा खासगी संस्थांना होत असतो.

आता प्रश्‍न उरतो तो सुधारणा काय करता येतील?
माझ्या मते, आयआयटीएम या हवामान संशोधन करणाऱ्या खात्याची जबाबदारी आयमएडीवर सोपवण्यात यावी. माहिती संकलन आणि संशोधन या दोन्हीची जबाबदारी आयएमडीकडे राहील. यासाठी आयआयटीमकडील सर्व उपकरणे आयएमडीकडे सोपवण्यात यावीत. दुसरी गोष्ट म्हणजे, आपली वायूसेना आयएमडीशी संलग्न करण्यात यावी. त्यांच्या संलग्नीकरणामुळे लष्करी शिस्तबद्धता येईल, तसेच रिअल टाईम रिसर्च होईल. तसेच ही माहिती भारतीय वायूसेनेला वापरता येईल आणि ती जनतेपर्यंत पोहोचवताही येईल. तिसरी गोष्ट म्हणजे, आयएमडी आणि जनता यांना जोडणारी आणि थेट जनतेला हवामान माहिती देणारी अशी जबाबदार यंत्रणा तयार करावी लागेल. ढगफुटी, गारपिट आदींबाबतची रिअल टाईम माहिती ही यंत्रणा ताबडतोब त्या-त्या भागातील जनतेपर्यंत पोहोचवेल.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याकडील रडार यंत्रणा ही कॅलिबरेटेड नाही. विशाखापट्टणम, कोलकाता आदी ठिकाणी लेखकाने स्वतः जाऊन हे पाहिलेले आहे. त्यामुळे या सर्व रडारमधील झेड आर पॅरामीटर कॅलिबरेट करावे लागतील. तसेच सर्व रडार आपल्याला कार्यान्वित करावे लागतील. सध्या वायूदलाची विमाने रडारवर दिसत असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव लष्कराकडून हवामान खात्याला रडार वापरण्याची परवानगी दिली जात नाही. परिणामी, हवामान खात्याकडे रडार असूनही ती नीट वापरली जात नाहीत. लष्कराची भूमिका योग्य आहे. कारण जर या रडारवर अतिरेक्‍यांनी हल्ला केला आणि ती ताब्यात घेतली तर सर्व विमानांच्या उड्डाणांविषयीची माहिती त्यांना मिळण्याचा धोका आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने लष्कराची भूमिकाही योग्य आहे. म्हणूनच भारतीय वायूसेना आणि हवाईखाते हवामान विभागाशी संलग्न करणे हा यावरील उत्तम पर्याय आहे. सॅटेलाईटस्‌ आणि ग्राऊंड लेवल ऑब्झर्व्हेशन्स यांचे सुपर कॉम्प्युटरवर एकत्रित विश्‍लेषण हवे. या तिघांचे माहितीचे सुपर कॉम्प्युटरने केलेले विश्‍लेषण हवामानाचे सुयोग्य चित्र आणि बिनचूक माहिती देऊ शकते. परदेशी बनावटीच्या मॉडेल्समध्ये फेरफार करत तीच मॉडेल्स भारतात हवामान अंदाजासाठी वापरली जातात आणि परिणामी ती निरुपयोगी ठरतात. भारतीय भौगोलिक वातावरणाला साजेसे भारतीय बनावटीचे “सक्षम रिअल टाईम मॉडेल’ तात्काळ हवामान माहितीसाठी बनवणे ही काळाची गरज आहे.

हे सर्व तांत्रिक मुद्दे लक्षात घेतानाच आपल्याला मान्सूनच्या बदललेल्या पॅटर्नकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मान्सूनचा पूर्वीचा असणारा पॅटर्न अलीकडील काळात पूर्णपणाने बदलून गेलेला आहे. 2003 पासून 2015 म्हणजे या वर्षाच्या पावसाचे भारतभरातील स्वरूप पाहता मॉन्सूनचा पॅटर्न” बदललेला आहे, हे स्पष्ट होते. उत्तरेकडील एक तृतीयांश भारतात पावसाचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. ढगफुटीचे उत्तरेकडील प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्रातील पावसात लक्षणीय प्रमाणात घट झाली आहे. या व्यतिरिक्त एका तासापेक्षा कमी कालावधीत 100 मिलिमीटरपर्यंत अचानक कोसळणाऱ्या पावसाची म्हणजेच ढगफुटीची संख्या तुलनात्मकदृष्ट्‌या वाढली आहे.

पूर्वी आपल्याकडे झाडांची संख्या अधिक होती. त्याऐवजी आता सिमेंट कॉंक्रिटची जंगले उभी राहात आहेत. झाडांमुळे तापमान आणि इतर वातावरणीय घटक स्थिर राहण्यास मदत होत असते. झाडे नष्ट होत गेल्यामुळे वाऱ्यांची दिशा आणि वेग यांवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच आज मान्सून पूर्वीप्रमाणे येताना दिसत नाही. मान्सूनचा लहरीपणा वाढला असून खंड पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. समुद्रावरुन जमिनीवर आणि जमिनीवरुन समुद्रावर जाणारे वारे -ज्यांना खारे वारे आणि मतलबी वारे म्हणतात – यांची दिशा आणि वेग बदललेला असून त्याचा अधिक सखोल अभ्यास होणं गरजेचं आहे. याचाच परिणाम शेतीवरही होत आहे. यावर उपाय म्हणून आपल्याला नव्या पद्धतीची, नव्या जातीची आणि पावसाने ओढ दिल्यास तग धरु शकणारी बियाणे निर्माण करावी लागतील. तसे झाल्यास दुबार पेरणीचे संकट टाळता येऊ शकेल.
समन्वयानं उपकरणांच्या मर्यादांवर मात, भारतीय बनावटीचं सक्षम मॉडेल, आधुनिक तंत्रज्ञानाचा पद्धतशीर वापर, ती हाताळणाऱ्या माणसांना प्रोत्साहन आणि सकारात्मक दृष्टिकोन यावरच हवामान खात्याच्या माहितीची अचूकता आणि खासगी हवामान संस्थांशी स्पर्धा अवलंबून आहे. हवामान खात्यात आमूलाग्र बदल हेच येत्या काळात शेतकरी आणि जनतेला तारु शकतील; अन्यथा त्याची फार मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल.

– किरणकुमार जोहरे 
(लेखक हवामान तज्ज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ आहेत)

Advertisement