आंतरराष्ट्रीय मुख्य बातम्या

गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या खांद्यावर आणखी एक जबाबदारी

सॅन फ्रान्सिस्को : गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या खांद्यावर आणखी एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गूगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेट इंकने सुंदर पिचाई यांना संचालक मंडळामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
अल्फाबेटचे सीईओ लॅरी पेज यांनी याबाबत माहिती दिली.  “गूगलचे सीईओ म्हणून सुंदर पिचाई यांनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. कंपनीच्या वाढीसाठी महत्त्वाचा वाटा उचलला आहे आणि नाविन्यपूर्ण प्रयोगही त्यांनी केले आहेत. पिचाई यांच्यासोबत काम करण्यास आवडतं आणि त्यामुळेच अल्फाबेटच्या संचालक मंडळात त्यांच्या समावेशनंतर उत्साह वाढला आहे.”  अल्फाबेटच्या संचालक मंडळात समावेश झाल्याने पिचाई यांच्यासमोर आणखी नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. गूगलमध्ये पिचाई यांनी उत्तम काम केले आहे. पिचाई गूगलचे सीईओ बनल्यानंतर गूगलने आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली प्रगती केली आहे. त्याचसोबत गूगलच्या प्रॉडक्ट्समध्येही नाविन्यपूर्ण सुधारणा पाहायला मिळाल्या. विशेष म्हणजे पिचाई यांची गूगलच्या सीईओपदी निवड झाल्यानंतर अल्फाबेटच्या शेअर्समध्येही 50 टक्क्यांची वाढ झाली होती. अल्फाबेटचा सर्वात मोठा महसूल गूगलमधूनच येतो.

Advertisement