आंतरराष्ट्रीय मुख्य बातम्या

ट्रम्प यांच्या आरोपांबाबत जावयाची होणार चौकशी

वॉशिंग्टन – अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणूकीत रशियाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने हस्तक्षेप केला होता हे प्रकरण सध्या अमेरिकेत खूपच गाजत असून या प्रकरणी ट्रम्प यांच्या जावयाचीही चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे हाही एक चर्चेचा विषय बनला आहे. जारेड कुश्‍नर असे त्यांच्या जावयाचे नाव असून ते ट्रम्प यांची कन्या इव्हान्का यांचे पती आहेत.

या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या हाऊस इंटेलिजन्स कमिटीशी कुश्‍नर हे उद्या बोलणार आहेत. कॉंग्रेसच्या समितीकडून तसेच इंटेलीजन्स कमिटीकडून अशा दोन्हीं प्रकारे सध्या या विषयाची चौकशी सुरू आहे. रशियाने डोनाल्ड ट्रम्प यांना या अध्यक्षीय निवडणूकीत मदत केली होती असा आरोप आहे. त्यामुळे ट्रम्प हे रशियाचे हस्तक असल्याची टीका त्यांच्यावर होऊ लागली असून या साऱ्या प्रकरणाची सध्या दोन स्वतंत्र समित्यांकडून चौकशी सुरू आहे.

ट्रम्प यांचे जावई कुश्‍नर यांनी स्वताच मध्यंतरी निवडणूक प्रचार काळात रशियाचे प्रतिनिधी आपल्याला भेटल्याची जाहींर कबुली दिली आहे.आणि आता ते स्वताच या चौकशीवर देखरेख ठेवणार आहेत. जून 2016 मध्ये कुश्‍नर, ट्रम्प यांचे एक पुत्र आणि त्यांचे माजी प्रचार व्यवस्थापक पॉल मनाफोर्ट यांनी एकत्रितपणे एका रशियन वकिलाची भेट घेतली होती. त्यात रशियन वकिलांनी ट्रम्प यांच्या विरोधात हिलरी क्‍लींटन यांची बदनामी करणारी माहिती पुरवण्याची हमी दिली होती. या बैठकीविषयी आम्हाला अधिक जाणून घ्यायचे आहे असे कॉंग्रेसच्या चौकशी समितीने म्हटले आहे. या समितीला आवश्‍यक ती सर्व माहिती देण्यास आम्ही तयार आहोत असे कुश्‍नर यांनी म्हटले आहे. या समितीसाठी कुश्‍नर यांनी दोन तासांचा वेळ दिला आहे.

 

Advertisement