आरोग्य जागर टॉप न्युज ताज्या बातम्या मुख्य बातम्या

नियोजनबद्ध आहार कोणता?

आपला भारतीय संस्कृतीतील आहार अतिशय योग्य आणि नियोजनबद्ध आहे. भाजी, पोळी, भात, आमटी, पोहे, उपमा हे पदार्थ अतिशय पौष्टिक आहेत. आपण आपला आहार सोडून अन्य पदार्थांचे पर्याय शोधतो. म्हणून खाद्यसंस्कृती बदलते आहे. आपले वेगळेपण आपणच जपले पाहिजे. आपल्या चौरस आहाराची किंमत आपल्यालाच समजत नाही, याची खंत आहे.

चरबी कशी कमी करावी?
आपल्या खाण्या-पिण्याला शिस्त असेल, तर चरबी वाढणार नाही. वाढली तरी कमी होण्यासही मदत होईल. सलग 30 मिनिटे एका जागेवर बसू नका. आपण शरीराचा पुरेसा वापर करीत नाही म्हणून चरबी वाढते. दरवर्षी अर्ध्या किंवा एक किलोने वजन वाढते. वजन वाढते, याचा अर्थ आपण आळशी होत आहोत, हे समजून घ्या. म्हणून गरज आहे ती मूव्ह मोअर अँड सिट लेस या मंत्राची.

कोणती फळे खावीत? 
आंबा, केळे, सीताफळ, चिकू आणि द्राक्ष ही फळे प्रत्येक भारतीयाच्या आहारात आवर्जून आलीच पाहिजेत. आरोग्यासाठी केळे हे सर्वोत्तम असल्याचा दुजोरा आता जगभरातून मिळत आहे. बाळाच्या आहारातही आईच्या दुधानंतर फळांमध्ये केळ्याचाच समावेश होतो.

मधुमेहासाठी आहार काय? 
खरं तर मधुमेहींनी जे पदार्थ खाल्ले पाहिजेत, तेच पदार्थ डॉक्‍टर टाळण्यास सांगतात. मात्र, भात, केळं आणि तुपाचा समावेश आहारात अवश्‍य असावा. दोन जेवणांमध्ये फार अंतर ठेवू नये, व्यायाम भरपूर करावा आणि अगदी झोपेपर्यंत टीव्ही पाहणे टाळावे.

शुगर-फ्रीचा वापर करावा का? 
शुगर फ्री आहारातून वर्ज्यच करा. आहारात जेवढी साखर आवश्‍यक असते, तेवढी खावी. लाडू, हलवा यासारख्या घरी बनणाऱ्या गोड पदार्थांत वापरली जाणारी साखर आरोग्यासाठी चांगली असते. ऊस आणि गूळ यांना एकमेकांशी रिप्लेस करू नये. आवश्‍यकतेनुसार पदार्थात साखर किंवा गुळाचा वापर करावा. शरीरातील उष्णता वाढवायला गुळाची मदत होते.
कडधान्य कशी खावीत?
आपण उसळ करताना कडधान्य शिजवून घेतो. त्यामुळे मोड आलेली कडधान्ये उकडून, उसळ करून खाणेच योग्य.

वजन आणि ताण यांचा संबंध 
वाढत्या ताणामुळे वजन वाढतं. फर्गेट, फर्गिव्ह आणि फॉरवर्ड या सूत्रानुसार जीवन जगायला सुरुवात केल्यास आयुष्यातील तणाव कमी होतील.

कोणते तेल किती वापरावे? 
शेंगदाण्याचे घाण्यावरून करून आणलेले तेल स्वयंपाकासाठी सर्वोत्तम आहे. तेल बनविण्याची पारंपरिक पद्धत अतिशय शुद्ध आहे. आहारात तेल बदलण्याची गरज नसते. पिशव्या किंवा डब्यांमध्ये मिळणारे आणि हृदयाच्या आकाराचे चित्र डब्यांवर दिसणारे तेल आरोग्याला योग्य नाही. लोणचे, तळलेला पापड, भजी हे पदार्थ आहारात आलेच पाहिजेत.

Advertisement