अग्रलेख अहमदनगर उत्तर महाराष्ट्र कोंकण ताज्या बातम्या पश्चिम महाराष्ट्र पिंपरी – चिंचवड पुणे पुणे जिल्हा मराठवाडा महाराष्ट्र मुख्य बातम्या मुंबई राज्य विदर्भ संपादकीय

‘बिहारी-बाहरी’ भाई-भाई

चार वर्षांच्या कालावधीमध्येच बिहारमध्ये राजकीय वर्तुळ पूर्ण झाले आहे. गेले काही दिवस सत्ताबदलाच्या नाटकाचे जे नेपथ्य रचले जात होते त्याचा प्रयोग यथासांग पार पडला आहे. सन 2015 मधील बिहार विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाला पराभूत करण्यासाठी जंगजंग पछाडले गेले होते, त्याच पक्षाच्या वा आघाडीच्या कळपात नितीशकुमार जाऊन पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री बनले आहेत. मागील निवणुकीत “जातीय’ शक्तींशी लढा देण्यासाठी नितीशकुमार यांनी लढा दिला. वीस महिन्यांतच आता त्याच “जातीय’ शक्तींशी हातमिळवणी करून “भ्रष्टाचारा’विरुद्ध लढा देण्याची भाषा ते करीत आहेत. हे नितीशकुमार आव आणतात तसे विचारधारेचे, नैतिकतेचे राजकारण निश्‍चितच नाही. हे चक्क सत्तेसाठी केलेले सोयीचे राजकारणच आहे. पूर्वी नितीशकुमार एनडीएमध्ये होते. वाजपेयी मंत्रिमंडळात मंत्रीही होते.

गुजरात दंगलीनंतर नरेंद्र मोदी यांच्यापासून अंतर राखण्यास त्यांनी प्रारंभ केला. एवढेच नव्हे तर मोदींबरोबर हस्तांदोलन करतानाचे छायाचित्र भित्तीपत्रकावर छापले म्हणून नितीश यांनी भाजप नेत्यांसाठी आयोजित केलेला भोजन समारंभही रद्द केला होता. नंतर मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार केले गेल्यावर ते एनडीएतून तडक बाहेर पडले होते. आता पुन्हा ते “नमोबंधना’त अडकले आहेत. पूर्वी “बिहारी’ व “बाहरी’ असा वादही झाला होता. पण आता दोघे “भाई-भाई’ झाले आहेत. राजकारणात केव्हाही काहीही घडू शकते असे म्हणतात. नितीश यांच्या “घूमजाव’ने हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. सन 2014 च्या लोकसभेतील प्रचंड यशानंतर बिहार विधानसभा निवडणुकीत तयार झालेले महागठबंधन व त्याला मिळालेले उत्तम यश मोदी व भाजपला खुपत होते. तेव्हापासून हे ऐक्‍य तोडण्याचे प्रयत्न पडद्यामागे चालू होते. त्याला यश येत नितीशकुमार अलगद “गळा’ला लागले आहेत. “काहीही करून सत्ता मिळवायचीच’, हे भाजपचे सध्याचे सूत्र आहे. त्याला धरूनच बिहारच्या घडामोडी झाल्या.

खरे तर बिहार विधानसभेत लालूंचा राजद सर्वात मोठा पक्ष आहे. नितीश यांच्या राजीनाम्यानंतर या पक्षाला राज्यपालांनी संधी द्यायला हवी होती. पण गोव्याप्रमाणे ती न देता थेट नितीशकुमारांनाच पुन्हा निमंत्रण दिले गेले आहे.

लालूंचा “चारा घोटाळा’ नितीश यांनी त्यांच्याबरोबर आघाडी केली तेव्हाच उघड होऊन लालूंना दणकाही बसला होता. आता नितीशना भ्रष्टाचार आठवणे, त्याविरुद्ध लढणे वगैरे हे सर्व सोयीचे राजकारण आहे. नितीशकुमार यांचा कल पुन्हा मोदी आणि भाजपकडे वळू लागला आहे, हे गेल्या काही दिवसांपासूनच स्पष्ट होऊ लागले होते. सर्जिकल स्ट्राईक, नोटाबंदीचे त्यांनी जाहीर स्वागत केले होते. राष्ट्रपती निवडणुकीत सर्वविरोधी पक्षांनी एकच उमेदवार देण्याची कल्पना आधी मांडून मग त्यांनी घूमजाव करीत एनडीए उमेदवार कोविंद यांनाच पाठिंबा देऊन टाकला. विरोधी पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकांनाही ते गैरहजर राहिले. तीन वर्षांपूर्वी ते ज्या नरेंद्र मोदींचा टोकाचा द्वेष करीत होते, त्या मोदींबरोबरच्या नितीशकुमार यांच्या भेटीही अलीकडे वाढल्या होत्या. बिहारमधील भाजपनेते सुशीलकुमार मोदी यांनी गेल्या काही दिवसांत लालूप्रसाद यादव कुटुंबियांविरोधात आरोपांचा जो सपाटा लावला होता, त्यासंबंधीची कागदपत्रे आपल्याला सरकारमधूनच मिळत असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. यावरून लालूप्रसादांशी नितीशकुमार काडीमोड घेणार याचे पुरेपूर संकेत मिळाले होते. लालूप्रसाद व कुटुंबियांच्या गैरव्यवहारांना कोणीच पाठिशी घालणार नाही. पण या कारवाईत पक्षपात होतो आहे, हे उघडपणे दिसत होते. कारण असेच आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप शिवराजसिंह चौहान, वसुंधराराजेंवर यांच्यावरही झाले आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष करीत फक्त लालू कुटुंबिय लक्ष्य केले गेले. या पार्श्‍वभूमीवर, बिहारमधील महागठबंधनाला सुरुंग लावण्याचे नेपथ्य रचले जात आहे, हे उघडउघड दिसत होते. नितीशकुमार यांनी पुन्हा भाजपच्या कळपात प्रवेश केल्यामुळे विरोधी पक्षाच्या ऐक्‍याला मोठा झटका मिळाला आहे. सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नितीशकुमार हेच विरोधकांच्या आघाडीचे प्रमुख चेहरा ठरले असते. पण त्यांनीच भाजप आघाडीत प्रवेश केल्याने 17 पक्षांच्या सर्वच विरोधकांची बाजू निश्‍चित कमकुवत झाली आहे. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षातही मुलायमसिंह व अखिलेश यांच्या तणातणी आहे. राष्ट्रपती निवडणुकीत मुलायमसिंह यांनी एनडीए उमेदवाराला पाठिंबा दिला होता. हे पाहता मोदी-शहा यांचे पुढील लक्ष्य मुलायमसिंह असू शकते. लालूपुत्र तेजस्वी यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होऊनही राजीनामा न दिल्याने नितीशकुमारांनी स्वतःच राजीनामा देऊन एकीकडे नैतिकतेचा आव आणला खरा; पण विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाचा कडवा नि टोकाचा विरोध केला, त्या पक्षाचा पाठिंबा घेऊन मुख्यमंत्रिपद पुन्हा टिकवण्याची भूमिका घेतली. ही कोणती नैतिकता असा प्रश्‍न विचारला जाऊ शकतो. राजकारणात सर्व काही क्षम्य असते असे म्हटले जाते. पण एरवी टोकाच्या नैतिकतेची प्रतिमा निर्माण करणाऱ्यांना हे शोभणारे नाही. लालूंबरोबरची अनैसर्गिक मैत्री नितीशकुमार यांनी 20 महिने सहन केली. आता लालूंपेक्षा मोदी बरे या निष्कर्षाला ते आलेले दिसतात. भाजपची संगत केल्यावर नितीश यांना भविष्यात बिहारमध्येच राहावे लागेल. कारण मोदी असेपर्यंत त्यांना राष्ट्रीय पातळीवर पार मोठी संधी मिळण्याची शक्‍यता कमीच. जुलै महिन्यात महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार असे सांगितले जात होते, तो अजून व्हायचाय. पण आधी बिहारचाच क्रमांक लागला.

Advertisement