अहमदनगर उत्तर महाराष्ट्र कोंकण टॉप न्युज ताज्या बातम्या पश्चिम महाराष्ट्र पिंपरी – चिंचवड पुणे पुणे जिल्हा मराठवाडा महाराष्ट्र मुख्य बातम्या मुंबई राज्य लाईफस्टाइल विदर्भ

श्रावणातील सण आणि धार्मिक महत्त्व

पुणे- श्रावण महिना अनेक व्रतवैकल्ये आणि सणांनी सजलेला आहे. श्रावण महिन्यास प्रारंभ झाला की, अनेक सण गोळा होतात. विशेष करुन महादेवाची आराधना या महिन्यात केली जाते. चातुर्मासातील सर्वांत श्रेष्ठ मास म्हणून श्रावण महिन्याचे महत्त्व आहे.

श्रावण हा पाचवा आणि पाचूसारखा हिरवागार महिना. पौर्णिमेस श्रवण नक्षत्र असते म्हणून श्रावण हे नाव. श्रावण म्हणजे हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन. हिरव्या रंगाची विशाल वस्त्रे लपेटून उभे असलेले चराचर डोळ्यांचे पारणे फेडते. क्षणात सूर्यकिरणे धरणीवर अवतरतात, तर दुसऱ्याच क्षणी घननिळा बरसतो आणि रेशीमधारा रिमझिमतात.

श्रावण सोमवार- या महिन्यातील सोमवारी एक वेळ जेऊन शिवव्रत करतात.

मंगळागौर- मंगळवारी नवविवाहिता मंगळागौरीची पूजा करतात. हे व्रत सौभाग्यवर्धक आहे. या दिवशी शिव, गणपती आणि गौरीची पूजा केली जाते.

लक्ष्मीपूजा-  भाविक स्त्रिया शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करतात,  हळदी-कुंकू देतात. यासोबतच जीवंतिका अथवा जीवती पूजन लहान मुलांचे रक्षण करण्यासाठी केले जाते. श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्र वारी जीवतीचे चित्र भिंतीवर लावून स्त्रिया त्याची पूजा करतात. श्रावणातील शुक्रवारी सायंकाळी सुवासिनींना घरी बोलावून हळद-कुंकू लावतात व दूध साखर, गूळ फुटाणे देतात.

रविवारी आदित्याची म्हणजेच सूर्याची पूजा करतात.

नागपंचमी- श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी हा श्रावणातील पहिला सण साजरा केला जातो. या दिवशी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केले जाते.

नारळी पौर्णिमा- नारळी पौर्णिमेला कोळी बांधव नदी वा समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करतात. याच दिवशी बहीण भावाला राखी बांधून हे पवित्र नाते अधिक घट्ट करते.

गोकुळाष्टमी – श्रावण वद्य अष्टमी म्हणजेच गोकुळ अष्टमीला भगवान विष्णूने धर्माचे रक्षण करण्याकरिता श्रीकृष्णाचा अवतार घेतला. श्रीकृष्णाचा जन्मदिवस कृष्णाष्टमीला आणि नवमीला गोपाळकाला हा दहीहंडी उत्सव साजरा होतो.

बैलपोळा- श्रावणी अमावास्येला बैलपोळ्याचा सण (पिठोरी) साजरा होतो.

निसर्गाचे मनोहारी रूप- पावसाळी फुलांनी हिरव्यागार वृक्षलतांनी नटलेली विलक्षण चिरसुगंधी विविधरंगी फुले हसऱ्या नाचऱ्या श्रावणाला लाजरा बनवतात. ऊन-पावसाचा विलोभनीय लपंडाव या दिवसांत अनुभवायला मिळतो. श्रावण जलबिंदूच्या माध्यमातून सूर्याच्या सप्तरंगांचे मनोहारी दर्शन घडवितो.

Advertisement